16 डिसेंबर थंडीचा अलर्ट : महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव, डिसेंबरच्या मध्यातही थंडीचा जोर कायम

16 डिसेंबर थंडीचा अलर्ट : महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव, डिसेंबरच्या मध्यातही थंडीचा जोर कायम

महाराष्ट्रात डिसेंबरच्या मध्यातही थंडीचा जोर कायम असून अनेक भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले जात आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा प्रभाव ठळकपणे जाणवत आहे, तर दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सध्या हवामान कोरडे असून थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे. जेऊर (करमाळा) येथे राज्यातील सर्वात कमी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, मोहळ येथे 8.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. अहमदनगर, नाशिक आणि पुणे (शिवाजीनगर) या भागांमध्येही किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही सकाळी आणि रात्री थंडीचा चांगलाच अनुभव येत आहे. सध्या राज्याकडे पुन्हा एकदा उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. मात्र, राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे त्या भागांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहिल्याने राज्याच्या उत्तर, मध्य आणि काही पूर्व भागांमध्ये थंडीची लाट सुरूच राहणार आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी किमान तापमानात थोडीफार वाढ झाली तरी सकाळची गारठा आणि रात्रीची थंडी नागरिकांना जाणवत राहणार आहे.

दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात मात्र थंडीचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव परिसरात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून थंडीचा कडाकाही कमी जाणवेल. कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात तापमान साधारण स्थिर राहण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने येत्या आठवड्यात पावसाची शक्यता नाही, त्यामुळे कोरडे आणि थंड हवामान कायम राहणार आहे.

Leave a Comment